लातुरात भरदिवसा तरूणाचा खून; कत्तीने वार करून दोन मारेकरी फरार
के वाय पटवेकर
लातूर: शहरातील सद्गुरुनगरमधील राधाकृष्ण मंदिराच्या पाठीमागील भर वस्तीत रस्त्यावर एक 35 वर्षीय तरूणाचा दोन अज्ञात मारेकऱ्यांनी दिवसाढवळ्या कत्ती आणि चाकूचे सपासप वार करून निर्घून खून केल्याची खळबळजनक घटना आज मंगळवार दि. 10 ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान घडली आहे. यातील मयताचे नाव गोकूळ मंत्री असल्याचे सांगण्यात येत आहे. या खूनाच्या घटनेने लातूर शहर हादरले असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. लातूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आजची खुनाची घटना भरदिवसा आणि भरवस्तीत घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास दादोजी कोंडदेवनगरात राहणारा गोकूळ मंत्री नामक 35 वर्षीय इसम आपल्या एमएच बीए या स्पेलंडर दुचाकीवरून घराबाहेर पडला होता. त्यासोबत दोन वीस-बावीस वर्षीय दोन तरूण त्याच्याच दुचाकीवर बसून जात होते. त्याच तरूणांनी सद्गुरु नगरात आल्यानंतर राधाकृष्ण मंदिराच्या मागील वस्तीतील रस्त्यावर गोकूळ मंत्री याच्या शरीरावर, डोक्यात, पाठीत चाकू व कत्तीने सपासप वार करून निर्घृणपणे खून केला. आणि मारेकऱ्यांनी तेथून पळ काढला. सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी हे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी हजर होवून पंचनामा केला असून मयताचे प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुुरु असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

0 Comments