पांचाळ देविदास श्रीनिवासराव यांच्या लेखणीतून...
कोरोना काळातील आपले आरोग्य व आपली जबाबदारी
आला आला पावसाळा आपले आरोग्य सांभाळा !असेच म्हणणे संयुक्तिक आहे. आता उन्हाळा ऋतु संपून पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे, पावसाळा म्हटला की पावसाचे दिवस सुरू झाले वारा, वादळ, विजा चमकणे, विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस, गारांचा पाऊस, सर्व परिसर हा थंडीने व्यापला जातो, सगळीकडे पाणीच पाणी होते खरं तर आज आपण कोरोना सारख्या दुष्ट आजाराच्या दुष्टचक्रातून मार्गक्रमण करीत जीवन जगत आहोत! आपल्याला कोरोणा सोबत लढत लढत जगायचे आहे व शेवटी धैर्याने, आत्मविश्वासाने त्याला हरवायचे आहे. पावसाळ्यामुळे नेहमी होणारे छोटे छोटे आजार, साथीचे आजार डोके वर काढू लागतात. बरेचसे आजार हे दूषित पाण्यामुळे व दूषित हवेमुळे होतात. दूषित हवा, दूषित पाणी तसेच दूषित जमीन या सर्वामुळे पर्यावरणातील घटकांना दूषित बनवतात व त्याचा परिणाम मानवी जीवनावर व आरोग्यावर होतो, कोरोणाच्या या काळात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याची खूप खूप गरज आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे आपण आजारी पडत नाही, आपण आपले आरोग्य सांभाळणे ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे. आपले आरोग्य सांभाळण्यासाठी व्यायाम करणे, हे खूप महत्त्वाचे आहे योगा, प्राणायाम, विविध खेळ, दोरीवरील उड्या, तसेच सायकलिंग करणे म्हणजेच सायकल खेळणे चालवणे व सतत सायकलचा वापर करणे हे खूप महत्त्वाचे आहे, कारण सायकल खेळण्यामुळे शरीराचा सर्वांगीण,व्यायाम होतो, मान, पाठ, पाय, गुडघे असा व्यायाम होतो त्याला काही खर्चही येत नाही, सांधे दुखी पाठ दुखी मान पाठ दुखणे हे सायकलने कमी होते. फुफुसावर दाब पडून ते सशक्त होते प्रत्येकाला या कोरोणाच्या काळात तेही पावसाळ्याच्या दिवसात आपले आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे. सर्दी, खोकला, ताप डोके दुखी, असे छोटे छोटे आजार डोके वर काढतात तेव्हा अशा आजारापासून सावध राहून त्यावर मात केली पाहिजे. आपले आरोग्य चांगले सुदृढ व निरोगी ठेवणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. त्याच बरोबर कोरोनाच्या या महामारी चा सामना करण्यासाठी, सर्वांना लस घेण्यासाठी प्रेरित करणे, लस घेण्याचे फायदे महत्त्व सांगणे, हे आपले आद्य कर्तव्य आहे. आपल्या अवतीभवती, परिसरात, शेजारीपाजारी तसेच आपण पाहतो दररोज गाडीवर भाजीपाला विकणारे, आपल्या कॉलनीत, घरासमोर आणुन आपल्याला पुरवणारे छोटे व्यवसायिक दूधवाले, फळवाले, भाजीवाले, फेरीवाले यांनासुद्धा लस घेण्यास प्रवृत्त केले पाहिजे एक जागरूक नागरिक म्हणून, एक देशाचा नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे सगळं काही नियमाने, कायद्याने व सरकारनेच केले पाहिजे असे नव्हे, मुळात आपले आरोग्य ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. नीटनेटके राहणे, स्वच्छता ठेवणे, मास्क वापरणे, हात धुणे, गर्दी टाळणे, हे सर्वसामान्य नियम झालेले आहेत. तेव्हा या सर्व नियमांचे स्वतः पालन करणे व इतरांनाही प्रेरित करणे ही काळाची गरज आहे. कोरोना च्या या काळात आपले आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य राखणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे! शाळा किंवा परीक्षेपेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य विद्यार्थ्यांचे जीवन महत्त्वाचे आहे, म्हणूनच महाराष्ट्र सरकारने इयत्ता दहावी व बारावी ची परीक्षा ही रद्द केलेली आहे हा अगदी योग्य व यथोचित निर्णय शासनाने घेतलेला आहे. जेणेकरून मुलांच्या मनावरील ताण कमी करून त्यांची मानसिकता, मानसिक आरोग्य हे चांगले व सकारात्मक राहते. कोरोना काळात विद्यार्थ्यांची मानसिकता, मानसिक स्वास्थ्य, राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तम आहार, विहार, व्यायाम व सकारात्मक मानसिकता ठेवणे आवश्यक आहे. जो व्यक्ती मानसिक दृष्टीने सक्षम आहे, सशक्त आहे, त्याला कसलीही भीती राहात नाही, तो कसल्याही संकटावर आत्मविश्वासाने, आत्मबलाने, मात करू शकतो व आपले आरोग्य टिकवू शकतो. व्यायामाबरोबरच हसणे व मनोरंजन करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण हसणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे, यासाठीच देश-विदेशात हसण्याचे क्लास लावले जातात व कृत्रिम हास्य आणले जाते. आपले आरोग्य उत्तम राखणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे, कारण आपण स्वतः आपल्या राष्ट्राचा एक भाग आहोत, राष्ट्राची संपत्ती आहोत, राष्ट्रासाठी आपली गरज आहे. देशाचे, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, म्हणून कशाही परिस्थितीत स्वतःला कोलमडन्या पासून वाचवावे व धैर्यशील बनवून आनंदी व उत्साही जीवन जगावे व आपलीयसोबत इतरांनाही प्रोत्साहित करा वे हीच आपली खरी जबाबदारी आहे.
पांचाळ देविदास श्रीनिवासराव(सहशिक्षक)

0 Comments