औसा शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल- उपमुख्यमंत्री अजित पवार
शेख बी जी
औसा: दि.१९ शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. शहरातील भुईकोट किल्ला व इतर पुरातन वास्तू मुळे पर्यटनाच्या माध्यमातून येथील युवकांना रोजगाराच्या संधी मिळतील.शहर विकासाला चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून आपण सर्वतोपरी अर्थसहाय्य करू असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले.माकणी ते औसा 37 किलोमीटर पाणीपुरवठा योजनेचे व शहरातील विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी डिजिटल प्रणालीद्वारे औसेकर जनतेशी संवाद साधताना गुरुवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी ते बोलत होते. अर्थमंत्री म्हणून औसेकर यांच्या विकासाला आपली खंबीर साथ राहील. मराठा भवन, तलाव संवर्धन, सांस्कृतिक सभागृहाचे नूतनीकरण, शहरातील रस्ते इत्यादी कामे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या प्रयत्नातून मार्गी लागले आहेत. भविष्यात शहरातील अंतर्गत रस्ते, सांडपाण्यासाठी भूमिगत नाल्या, शहर स्वच्छता, वृक्ष लागवड व संवर्धन अशा योजनांचा प्रकल्प तयार करावा. नागरिकांनीही नागरी सुविधा मिळत असताना वेळेत कराचा भरणा करून पालिकेस सहकार्य करावे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून उपाय योजना प्रभावीपणे राबवाव्यात. औसा शहर स्वच्छ व सुंदर शहर म्हणून वेगळी ओळख निर्माण व्हावी. स्वच्छ सर्वेक्षण योजनेत औसा नगरपालिकेने चांगले काम केल्यामुळे पालिका पारितोषिकाची मानकरी ठरली याचा मला सार्थ अभिमान वाटतो असेही उपमुख्यमंत्री. अजित पवार यांनी स्पष्ट करून औसेकर जनतेला शुभेच्छा दिल्या. औसा नगरपालिकेत नगराध्यक्षांनी फेसबुक आणि युट्युब लाईव्ह ची व्यवस्था केल्यामुळे आणि शहरात एलईडी स्क्रीनची व्यवस्था केल्याने शहरवासीयांना हा कार्यक्रम पाहता आला. नगरपालिका सभागृहात उपनगराध्यक्ष कीर्ती कांबळे, मुख्याधिकारी वसुदा फड, माजी उपनगराध्यक्ष जावेद शेख, स्वच्छता सभापती मेहाराज शेख, माजी स्वच्छता सभापती तथा नगरसेवक मुजाहिद शेख, पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, नियोजन मंडळाचे सदस्य श्रीकांत सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय कोळपे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले.
0 Comments