नळेगाव परिसरात श्रावणासरी बरसल्याने पिकांना जीवदान
नळेगाव:(प्रतिनिधी/ळासाहेब बरचे) मागील महिन्यात पडलेल्या पावसामुळे पिके चांगलीच बहरली होती. मात्र महिनाभर पावसाने उघडीप दिल्याने बहरलेली पिके सुकून जात होती. काही भागात तर सोयाबीनला फुल लागत असताना पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले होते.तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर अखेर नळेगाव परिसरात पावसाच्या श्रावण सरी बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.खरिपाच्या पिकांना तात्पुरता आधार मिळाला असून मोठ्या पावसाची आशा शेतकऱ्यामधून व्यक्त होत आहे. नळेगाव परिसरात मृग नक्षत्राने लावलेल्या जोरदार हजिरीमुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली.अधूनमधून पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे सर्वच भागात पीक परिस्थिती उत्तम होती. काही भागात सोयाबीनला फुल लागण्याची प्रक्रिया सुरु झाली तर काही भागात शेंगा लागण्यास सुरुवात झाल्याने पावसाची गरज असतानाच पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मागील काही वर्षांपासून नळेगाव परिसरात सोयाबीन हे प्रमुख पीक बनले आहे. चांगले उत्पादन देण्याची क्षमता सोयाबिनमध्ये असल्याने शेतकऱ्यांचा सोयाबीनचे पीक घेण्याकडे कल वाढला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात झालेल्या जोरदार पावसाने परिसरात पेरणी झाली.पेरण्या झाल्यानंतर अनेक भागात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे काही भागात खोड अळीचा पादुर्भाव दिसून आला.शेतकऱ्यांनी महागडे औषध घेऊन त्याचा बंदोबस्त केला.जुले महिनीच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसानंतर 25 दिवस पावसाने उघडीप दिल्याने पिके दुपार धरू लागली होती. दीर्घ विश्रांतीनंतर पडलेल्या पावसाने खरिपाच्या पिकाला तात्पुरते जीवदान मिळाले आहे.

0 Comments