यावर्षीची शाळा पुस्तका विनाच,ऑनलाइन शिकवलेले कळेना,पालक वर्गाकडे मोबाईल नसल्याने मुले शिक्षणापासून वंचित
शेख बी जी
लातूर: दि.५ राज्यात प्राथमिक व माध्यमिक शाळेची सुरुवात 14 जून पासून करण्यात आली. मात्र आज पर्यंत मुलांना अत्यावश्यक असलेली पुस्तके मात्र उपलब्ध करून देण्यात शासन असमर्थ ठरले आहे. पुस्तके नसल्यामुळे मुले काय शिकत आहेत ? व शिक्षक काय शिकवत आहेत ? या संभ्रमावस्थेत मध्ये विद्यार्थी व शिक्षक असल्याचे चित्र सर्वत्र आहे. शासनाने "वर्क फ्रॉम होम"या नियमानुसार शिक्षकांना ऑनलाईन धडे देण्याचे निर्देश दिले आहेत. शिक्षक आपले कर्तव्य चोख बजावत आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवलेले समजत नसल्याच्या तक्रारी पालकाकडून येत आहेत. ज्यांच्याकडे मोबाईल उपलब्ध आहेत असे विद्यार्थी तर ऑनलाइन क्लास करत आहेत. मात्र मोलमजुरी करून आपली उपजीविका पूर्ण करणाऱ्या पालकांकडे स्मार्टफोन नसल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मात्र शासन दरबारी अनुत्तरीतच आहे. अशा मुलांसाठी काय यंत्रणा राबवता येईल या बाबतीतही शासन उदासीन असल्याचे दिसते. जास्त वेळ ऑनलाइन विद्यार्थी उपस्थित असल्याने त्यांच्या डोळ्यांचा व कानाच्या आजाराचा प्रश्नदेखील भेडसावत आहे. जवळपास दोन महिने उलटले तरीही विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके नसल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची कमी झाली आहे. शासनाने ताबडतोब विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यावीत अशी पालक वर्गातील मागणी होत आहे.

0 Comments