दयानंद कला महाविद्यालयात स्टाफ अकॅडमी आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यशाळेचा आज शुभारंभ

लातूर: दयानंद कला महाविद्यालयात स्टाफ अकॅडमीच्या वतीने प्राध्यापक व कर्मचारी यांच्या मनोबल विकासास गती देणाऱ्या फॅकल्टी डेव्हलपमेंट या पाच दिवसीय कार्यशाळेचे आरंभ पुष्प आज गोवण्यात आले. प्रस्तुत कार्यशाळेस पुणे येथील ' हेल्दी माईंड कन्सल्टन्सी ' चे मा.अमित मेढेकर मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांनी पाहिले सत्र स्ट्रेस रिलिज यावर घेतले. छोट्या छोट्या कृती करत सर्वांचे लक्ष वेधून घेत एकाग्र कसे करायचे याचे त्यांनी करून घेतलेले प्रात्यक्षिक सर्वांनाच खूप भावले. छोट्या छोट्या गोष्टी, किस्से सांगत मनाला आपल्या काबूत कसे आणायचे, जग काय म्हणेल हा संकोच काढून टाकला की आपण कसे रिलिज होतो यावर त्यांनी केलेले मार्गदर्शन खूपच मोलाचे होते. पहिल्याच दिवशी त्यांनी प्राध्यापक व कर्मचारी यांना बोलण्यास वाव दिला मुक्त संवादामुळे सत्र कसे संपले कळलेही नाही. ' खूप छान, उपयुक्त मार्गदर्शन ' , 'एका सत्रातच मन प्रसन्न झाले', 'इतके मोकळे खूप दिवसांनी हसलो ' अशा प्रतिक्रियानी आजचे सत्र थांबले. प्रस्तुत कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. डॉ. सुनीता सांगोले यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक मांडले, पाहुण्यांचा परिचय करुन दिला. कोणताही नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्यास दयानंद शिक्षण संस्था अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी यांच्याकडून प्रोत्साहन व पाठबळ लाभते. त्याबद्दल ऋण व्यक्त केले. कार्यशाळा आयोजित करण्यास महविद्यालयचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड हे आम्हा सर्वांना सतत क्रियाशील राहण्यास प्रोत्साहित करतात. त्याची प्रेरणा व सहकार्य यामुळेच ह्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करता आले याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रस्तुत प्रशिक्षण प्राध्यापक, कर्मचारी यांच्या मनोबल विकासास हातभार लावण्यासाठी निश्चितच फल दायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ध्यान साधनेने कार्यक्रमाचा समारोप झाला. पुढे चार दिवस रोज नवा विषय घेऊन कार्यशाळेचे पुष्प गुंफले जाईल.
0 Comments