ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या लेखणीतून...
दादांची सर कुणालाही नाही..
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या निलंगा तालुक्याची शान डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर उपाख्य दादा यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्य विनम्र अभिवादन करतो.. दादांना जावून एक वर्ष झाले.. आठवणी काही केल्या जात नाहीत.. दादांनी वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोना सारख्या गंभीर आजारावर मात केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक शुचिर्भूत नेता आज आपल्यात नाही.. अत्यंत साफसुतरे राहणीमान, उच्च विचार आणि विकासाचा धगधगता अग्निकुंड आज आपल्यात नाही.. दादाना भेटून आल्यावर एक संजीवनी मिळायची.. सत्तेच्या प्रांगणात कधीही, कुणासमोरही न झुकणारे दादा आमचे आदर्श आहेत.. निलंग्याच्या प्रत्येकाची मान अभिमानाने ताठ राहते असे दादा खरंच आजही लख्ख आठवत राहतात.. शेवटी थोडीशी स्मृती विस्मरणात जात होती तरीही मुंबईच्या पक्षाच्या बैठकीला दादा हजर होते.. अधूनमधून कार्यक्रमाला हजेरी असायचीच.. दादांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे निर्णय केले.. पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी केलेली कामे आजही शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवत आहेत.. दादांनी स्वतःच्या चारित्र्याला खूप सांभाळलं.. अपेयपान आणि निषिद्ध खाद्य त्यांनी केलंच नाही म्हणून दादा आज राजकारण्यांचे आदर्श आहेत. राजकारणात आता असे मैलाचे दगड खूप कमी आहेत.. पावला पावलावर चकल्या देणाऱ्या, मोहाला बळी पडणाऱ्या राजकारणात दादा साफसूतरे राहिले.. स्वच्छता हा त्यांचा महत्वाचा गुण.. ते मुख्यमंत्री असताना अनेकदा त्यांच्या बेडरूम पर्यंत जाऊन बोलण्याचा योग आला. महाराष्ट्रातील आजच्या राजकारण्याशी तुलना करायही झाल्यास दादांचा नंबर पहिला लागतो.. इतकी निरपेक्ष, निष्कलंक माणसे आज राजकारणात दिसत नाहीत.. दादांना फक्त एक कलंक लागला, तो खरा की खोटा याचा विचारही न करता त्यांनी राजीनामा दिला. त्याच बेसवर ते ताठ मानेने उभे असायचे.. पद, प्रतिष्ठा राजकारणात महत्वाची असते त्यांनी ती जपली.. संस्थात्मक आणि पाटबंधाऱ्याचे जाळे त्यांनी निर्माण केले.. ज्यांना दादांना जवळून पहायचे आहे आणि बोलायचे आहे, त्यांनी एकदा त्यांच्या स्पेशल संग्रहालयाला भेट द्यावी.. दादा राजकारणात दादा माणूस म्हणूनच जगत राहिले.. मला अजूनही माझे बालपण आठवते, दादा माझ्या गावात यायचे म्हटले की, स्त्रिया तासनतास डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन उभ्या असायच्या.. स्वागतासाठी गावेच्या गावे सज्ज असायची.. त्यांच्या वागण्या, बोलण्यात कमालीची गोडी होती.. तासनतास बोलत राहावे वाटायचे.. दादांच्या पाठीमागे आज त्यांचे चिरंजीव अशोक पाटील राजकारणात आहेत.. दादांच आयुष्य प्रचंड समाधानच होत.. राजकारणात एक दरारा होता, गांधी कुटुंबाशी पक्की नाळ होती.. राजकारणात आता अश्या नेत्यांची वाणवा आहे.. महाराष्ट्राचे राजकारणात आज रोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, अश्या परिस्थितीत दादा मला स्थितप्रज्ञासारखे वाटतात.. आजही मी महाराष्ट्रात फिरताना अनेक कार्यालयात, रेस्ट हाऊसवर काम करणारे कर्मचारी भेटले की, निलंगेकर साहेबामुळे आम्ही आहोत हे सांगितले की ऊर भरून येतो.. निलंगा येथील आहोत असे सांगताच निलंगेकरांचा निलंगा का? असे म्हटले की मान ताठ होते.. त्यांची उंची कोणीच गाठू शकत नाही.. इतके निरपेक्ष राजकारणात आता राहता येणे शक्य नाही.. प्रत्येक ठिकाणी पराकोटीचा स्वार्थ भरला असताना दादांची आठवण क्षणोक्षणी येत राहते.. आज दादासायला हवे होते.. राजकारणाला शिस्त लावण्यासाठी, मतभेद विसरून राजकारणात शिस्त पाळण्यासाठी, कार्यकर्त्यांचा विचार करण्यासाठी... आमची ओळख निर्माण करणाऱ्या आणि स्वाभिमान जपत राजकारण करणाऱ्या दादांना विनम्र अभिवादन ..
संजय जेवरीकर{ज्येष्ठ पत्रकार}

0 Comments