Latest News

6/recent/ticker-posts

रक्षाबंधन: बहिण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण

देविदास पांचाळ यांच्या लेखणीतून...

रक्षाबंधन: बहिण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण


"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ,क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे ."श्रावण महिन्याची सुरुवात होते आणि, श्रावण महिना म्हटला की सणांचा वर्षाव सुरू होतो. रिमझिम रिमझिम पाऊस सुरु होतो व आपल्या स्वागताला येतात वेली, फुले,पाखरे, पक्ष्यांची किलबिल वाऱ्याची झुळूक निसर्गातिल सुगंधी, सुगन्ध दवळत असते. श्रावण महिन्यातील येणार्‍या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात आणि याच पौर्णिमेला रक्षाबंधन हा महत्त्वाचा सण साजरा केला जातो .सर्वत्र देशभर मोठ्या आनंदाने साजरा केला जातो रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या पवित्र निखळ प्रेमाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो .या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून आपले पवित्र प्रेम व्यक्त करते व जीवनभर अशीच तुझी साथ राहू दे येणाऱ्या संकट काळात माझे रक्षण ही कर अशी जबाबदारी ती आपल्या भावावर टाकते व निश्चिंत राहते. जीवनभर असेच प्रेमाचे स्नेहाचे नाते असू दे व माझ्या भावाचे आरोग्य निरोगी सुदृढ राहु दे. त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे अशीच प्रार्थना देवाला करते. रक्षाबंधन या सणा दिवशी घरी गोडधोड पदार्थ केले जातात. बहिण आपल्या भावाला पंचारती ने ओवाळते व राखी बांधते, भाऊ त्याची परतफेड म्हणून आपल्या लाडक्या बहिणीला काही ना काही भेट वस्तू, गिफ्ट देतो ही अशी परंपरा   चालत आलेली आहे. रक्षाबंधन म्हणजे ओवाळणी आली, ओवाळणी म्हणजे भावाने आपल्या बहिणी साठी काहीतरी भेटवस्तू देणे. ही पूर्वपरंपरा चालत आलेली आहे. पण आजच्या दिवशी नवीन सुरुवात म्हणून भावाने आपल्या बहिणी साठी 5 सुंदर फुलांचे व फळांचे वृक्ष गिफ्ट ओवाळणी म्हणून दिले तरी खूप मोठे कार्य होईल. तेच वृक्ष बहिण आनंदाने आपल्या अंगणामध्ये लावेल व सहजासहजी वृक्षारोपण होईल,तिच्या कुटुंबात आनंदाची लहर येईल व यातून समाजाला एक नवीन आदर्श मिळेल! असेही आपल्याला करता येते. आजच्या दिवशी "सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी ही माया "असं म्हणत बहीण आपल्या भावाला आनंदाने ओवाळते व शुभ आशीर्वाद देते ."पोर्णिमेचा दिवस आज सोनियाचा झाला ,बांधिती ऐसी राखी बहिण भावाच्या हाताला. रेशमाची मुलायम, स्नेहाची राखी बहीण आपल्या भावाला बांधत असते व आपले नाते उत्तरोत्तर असेच घट्ट व्हावेत हीच प्रार्थना करत असते. बहिण मग ती लहान असो की मोठी ती आपल्या भावावर अपार प्रेम करते. माझा भाऊ माझा पाठीराखा आहे हा आत्मविश्वास त्यांचा असतो व तो भावाने पूर्ण केलाच पाहिजे ."छोटेसे बहिण-भाऊ उद्याला मोठाले होऊ" बालपणीच्या आठवणीला उजाळा दिला तर लहानपणीचे बहिण-भाऊ त्यांचे एकमेकांवरील निखळ प्रेम व त्यांच्या खोड्या, त्यांच्या छोट्या छोट्या वस्तूसाठी केलेलं भांडण, घातलेला धिंगाणा, घरातील आरडा-ओरड भावासाठी आईबरोबर घातलेली हुज्जत, लहानपणी दोघांनाही एकच वस्तू आवडत असते व तीच वस्तू दोघांना पाहिजे असते तीच वस्तू आणि त्याच वेळी! मग पुस्तक असेल ,  बॉल असेल, खाऊ किंवा खेळणी असेल दोघांपैकी कोणीही मागे सरायला तयार होत नाही. हीच अखंड भावा बहिणीचे प्रेम मोठे होण्यापर्यंत राहते .दोघेही जेव्हा मोठे होतात, बहिणीचे लग्न जमते लग्न लागते व त्या दिवशी लग्न करून ती सासरी निघते, त्यावेळी खरे बहिण भावाचे प्रेम आपल्याला दिसून येते. तीच बहीण दादा दादा म्हणून शेकडो लोकांमधून भावाला शोधते व भावाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडते व हंबरडा फोडते! हेच बहिण-भावाचे अखंड प्रेम व नाते असते .तिने रक्षाबंधनाला बांधलेल्या रेशमी धाग्याचा विश्वास, राखीचा विश्वास, प्रेम, दोघांकडेही असते .भाऊ किती हि दूर जरी असला किंवा बहिण कितीही दूर जरी असली तरी रक्षाबंधनाला एकमेकांना भेटण्यासाठी व राखी बांधण्यासाठी येतात व आनंदाने हा सण साजरा करतात. याच सणाला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात कारण समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव याच पौर्णिमेला समूद्र देवाची पूजा करतात. समुद्र देवतेची पूजा करून नारळ अर्पण करतात व आपल्या उद्योगाची भरभराट होण्यासाठी प्रार्थना करतात. आनंदाने नृत्य करतात ,गीत गातात म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. रक्षाबंधन हा पूर्व परंपरेपासून चालत आलेला एक वैशिष्टपूर्ण सण आहे. जो जगात आपल्या संस्कृतीची एक नाविन्यपूर्ण ओळख करून देतो. रक्षाबंधन या नावातच अर्थ दडलेला आपल्याला दिसून येतो रक्षा करण्यासाठी बांधलेले बंधन. हे कुणीही, कुणालाही बांधू शकतो. एक मित्र दुसऱ्या मित्राला, एकमेकाला बांधून आपल्या मैत्रीची साक्ष देतात. आधुनिक काळात वृक्षाला राखी बांधून आपला मित्र सखा, समजून त्याची सेवा केली जाते. नाते रक्ताचे असो की ,मानलेले असो ते मनाने पवित्र असले पाहिजे .त्यासाठीच हा रेशमाचा, प्रेमाचा ,सुकोमल धागा बांधला जातो. रक्षाबंधनाच्या निमित्ताने एकमेकांची आठवण होते. बहिण बारा कोसावर दूर दूर असली तरी मनाने प्रेमाने अंतकरणाने जवळ असतेच. भाऊ आपल्या पाठीशी आहे, असा आत्मविश्वास बहिणीच्या मनात असतो." भैया मेरे राखी के बंधन को निभाना" म्हणत आनंदाने राखी बांधून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. आधुनिक काळात शिक्षणाने व नोकरीमुळे बहिण-भावाची कुटुंबापासून ताटातूट, कुटुंबापासून दुरावा होत असताना दिसून येत आहे. किमान अशा सणांच्या निमित्ताने एकत्र येऊन हा दुरावा दूर करता येईल .तसेच दोघांनी मिळून आपल्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणे त्यांना वृद्धाश्रमात न पाठवणे ,त्यांची घरीच अखंडपणे सेवा करणे, ही आपली सर्वांची खूप मोठी जबाबदारी आहे. एक सामाजिक जबाबदारी व उत्तरदायित्व म्हणून या रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिण भावाने ठरवले पाहिजे व आपल्या कुटुंबाचा आधार बनुन देशासाठी ,समाजासाठी, राष्ट्रासाठी एक चळवळ उभी केली पाहिजे. तरच आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित व आनंदी राहू शकेल. भविष्यकाळात सरकारला प्रत्येक गोष्टीचे नियमच काढावे लागतील अशी वेळ येणार नाही. आणि हेच खऱ्या अर्थाने हा सण साजरा करण्याचे सार्थक होईल. नवी पिढीने आपल्या अभ्यासाबरोबरच, शिक्षणाबरोबरच ,आपले कुटुंब व आपली जबाबदारी याकडेही लक्ष दिले पाहिजे येणाऱ्या काळात आपल्या कुटुंबाची एकता व अखंडता ही खूप महत्त्वाची आहे. असेच भावा बहिणीचे प्रेम निरंतर राहो हीच अपेक्षा .

रक्षाबंधनाच्या सर्वाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

🖋️ देविदास श्रीनिवासराव पांचाळ

Post a Comment

0 Comments