नळेगाव बसस्थानकाची दयनीय अवस्था
नळेगाव:(प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे) नळेगाव येथील बसस्थानकाची दयनीय अवस्था याकडे बसस्थानक प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधीचे पण दुर्लक्ष झाले आहे. सध्या पाऊस असल्याने परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले असून यामुळे प्रवाशांची तारांबळ उडते आहे. बस स्थानक प्रशासन बसस्थानक समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. नळेगाव येथील बसस्थानकातील अवस्था दयनीय झाली आहे. या ठिकाणी प्रवाशांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाहीत. बसस्थानकात अपुरी आसन व्यवस्था असल्यामुळे बस येई पर्यंत प्रतीक्षा करण्यासाठी प्रवाशांना नाईलाजाने थांबावे लागते. बस स्थानक परिसरात स्वच्छतेचा अभाव असून ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्वच्छता केली जात नसल्याने परीसरात वराहांचा मुक्त संचार असतो. बस स्थानक परिसरात कुमट वास येत असल्याने प्रवाशांना नाकाला रुमाल बांधूनच थांबावे लागते. या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींचेही या समस्यांकडे दुर्लक्ष आहे. प्रवाशांना सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम आगर प्रशासनाचे आहे. सध्या तर पाऊस सुरु असल्याने परिसरातील खड्यांमध्ये पाणी साचून त्यातून बस गेल्यानंतर पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. या सर्व प्रकारामुळे बसस्थानकातून चालतानाही मोठी सावधानता बाळगावी लागत आहे. किमान खड्डे बुजवणे व परिसरातील स्वच्छतेसाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी प्रवाशांसह नागरिक करीत आहेत.

0 Comments