लातूर पोलिसांची कारवाई: मद्याचे सेवन करून वाहने हाकणाऱ्या 127 मद्यपि विरोधात विशेष मोहिमेअंतर्गत 127 गुन्हे न्यायालयात दाखल
लातूर: पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे आदेश व निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात संपूर्ण लातूर जिल्ह्यात मद्यप्राशन करून वाहन चालविणार यांच्याविरोधात विशेष ड्रंक अँड ड्राइव्ह ची विशेष मोहीम राबविण्यात आली होती. सदर मोहिमेअंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या 127 मद्यपींना लातूर पोलिसांनी कोर्टाची पायरी चढायला लावली. मद्यप्राशानानंतर वाहने चालवणाऱ्या चालकांमुळे अनेक गंभीर अपघात होतात. ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या वाढत्या प्रकारामुळे गेल्या काही दिवसात पोलिसांनी मद्यपींना धडा शिकवण्यासाठी दंडात्मक कारवाईसोबत थेट कोर्टात पाठविण्याची मोहीम राबविण्यात आली असून दिनांक 24.6.2022 ते 27.6.2022 या 4 दिवसाच्या कालावधीत 127 मद्यपी वाहनचालकांना कोर्टात पाठवण्यात आले असून जवळपास 127 इतक्या वाहनचालकांवर कारवाई करीत 38,000/- रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ड्रंक अॅण्ड ड्राईव्हबाबत वाहतूक पोलिस सातत्याने कारवाई करीत आहेत.
मद्यप्राशन करून वाहन चालवणे गुन्हा असून मद्यप्राशन करून वाहन चालविण्यामुळे चालकाचा तसेच इतरांचा जीव धोक्यात सापडतो. ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या केसेस करताना ब्रेथ अनालायझर वापरले जात आहे. रक्तातील अल्कोहलचे प्रमाण जास्त आढळून आल्यास संबंधित वाहनचालकाचे वाहन लागलीच जमा करण्यात येते.तसेच, त्याच्यावर गुन्हा दाखल करून ते प्रकरण कोर्टात सादर करण्यात येत आहे.
ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या गुन्ह्यात संशयित दोषी आढळून आला तर त्यास मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १८५ नुसार सहा महिने शिक्षा किंवा दहा हजार रुपयांचा दंड किंवा हे दोन्ही होऊ शकतात. याबरोबर त्याने दुसऱ्या वेळी अशाच प्रकारे कायद्याचे भंग केल्याचे सिध्द झाल्यास दोन वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.
लातूर पोलिसाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून मद्यपान करून वाहन चालवू नये सदरची मोहीम यापुढे अशीच चालू राहणार आहे.

0 Comments