Latest News

6/recent/ticker-posts

देशाचे भविष्य आणि आधार स्तंभ असणाऱ्या तरुणांना लातूर पोलीस अधीक्षक यांचे सोशल मीडियावरुन आवाहन

देशाचे भविष्य आणि आधार स्तंभ असणाऱ्या तरुणांना लातूर पोलीस अधीक्षक यांचे सोशल मीडियावरुन आवाहन

शब्दशः बी डी उबाळे

लातूर: प्रिय भरती परीक्षार्थी, कुठल्याही आंदोलनाला जाण्यापूर्वी दहा वेळा विचार करा... हा निरोप सर्व आर्मी आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आमच्या विद्यार्थी मित्रांसाठी. 'कर्मण्ये वाधिकारस्ते मा फ्लेशु कदा च न' आपले कर्तव्य आहे विद्यार्थी बनणे, परीक्षार्थी बनणे, प्रयत्नार्थी बनणे आणि त्याहून महत्वाचं फळाची अपेक्षा न ठेवता प्रयत्न करत राहणे. असा हा विद्यार्थी म्हणून आपले काम आहे अभ्यास करणे, तयारी करणे, कष्ट घेणे. शासन आपापल्या पद्धतीने नियम, अधिनियम, कायदा बनवते आणि बदलत राहते. त्याला कारणही असतात आणि त्याच्यावर विधानभवन, संसदभवन, मा सर्वोच न्यायालय या ठिकाणी चर्चा ही होतात. मग त्या चर्चामधून तो कायद्यात, नियमात, शासकीय प्रक्रियेत केलेला बदल ठेवायचा की नाही याचा सुद्धा निर्णय होतो. शासन आणू इच्छित असणाऱ्या अग्निपथ योजनेचे सुद्धा तसेच आहे. त्यामुळे योग्य लोक, योग्य आणि संविधानिक / संसदीय / न्यायिक (न्यायालयात जाऊन) पद्धतीने त्याच्यावर विरोध करतील, चर्चा करतील आणि मग यंत्रणा तसा निर्णय घेईल. पण कोणीतरी उगाच सोशल मीडिया वरती आवाहन केलं म्हणून उगाच रस्त्यावर उतरून आपल्या भवितव्याची स्वतः अविचाराने माती करून घेऊ नका. गेल्या हिंदुस्थानी भाऊ सरकार च्या दंग्यांमध्ये आपण याची अनुभूती घेतलेली आहे. लक्षात ठेवा तुम्हाला सोशल मीडिया वर आवाहन करणारा अनोळखी चेहरा कदाचित तुमच्या पाठीमागे राहून दगड फेक किंवा जाळ पोळ करणारा असेल. संधी मिळताच तो पुढच्या कायद्याच्या चकाट्यात अडकण्या आधीच निसटता पाय काढेल; पण वाटोळं होईल ते तुमच्या भावीतव्याच. गुन्हे दाखल झाल्यामुळे नोकरी मध्ये स्थायित्व मिळवता येणार नाही. भरती प्रक्रिया पूर्ण करूनही गुन्हे दाखल झाल्यामुळे चारित्र्य पडताळणी फेल गेली म्हणून अनेकांची संधी हुकल्याची आम्ही रोज पाहतो. आणि म्हणूनच ही अनुभवाची आर्त साद देत आहोत. कुठल्याही आंदोलनासाठी आधी प्रशासनाकडून नियम, अटी, शर्ती, विविध परवानग्या लागू केल्या जातात. त्यामुळे कुठल्याही आंदोलनाला जाण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. दुसऱ्याच्या फायद्याच्या भाकऱ्या भाजण्यासाठी स्वतःच्या भविष्याची राखुंडी करू नका. तुमच्या कष्टांना ईश्वर शंभर हत्तीचे बळ देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

जय हिंद.

असा अनमोल "मानवता परमो धर्म",संदेश लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी फेसबुक पेजच्या माध्यमातून दिला आहे.

Post a Comment

0 Comments