इ झेड खोब्रागडे(भाप्रसे नि) यांच्या लेखणीतून...
माझ्या प्रशिक्षणाची गोष्ट: इ झेड खोब्रागडे.
तहसीलदार कारंजा घाडगे यांचेकडील ट्रेनिंग नंतर ,आर्वी एसडीओ कडे ट्रेनिंग साठी गेलो. एसडीओ काय काम करतात ,कसे करतात, त्यांचे अधिकार काय, कायदे कोणते?, लोकांशी संवाद कसा? इत्यादींचा अभ्यास करायचा होता. प्रशिक्षणानंतर मला ही एसडीओ पदावर काम करायला मिळणार होते. एसडीओ कडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 व त्या अंतर्गत 1971 चे नियमा अंतर्गत मूळ आणि अपील चे अधिकार, CrPc चे अधिकार, मुंबई पोलीस ऍक्ट, स्वस्त धान्य दुकान मंजूर, इतर ही जमीन विषयक कायदे , सुपरवायझरी अधिकार, इत्यादी आहेतच. वेळोवेळी येणारे कायदे व त्याअंतर्गत जबाबदारी, शासनाने सोपविलेली कामे, कायदा व सुव्यवस्था हे सगळे करावे लागते. उप विभागातील विकासात्मक कामे व समन्वय असा रोल असतो. रोजगार हमी योजना , त्यात आहेच. समाजातील मागास वर्गासाठी समर्पणाचे काम, त्यांचे साठी असलेल्या कायद्याची नीट अमलबजावणी हे ही महत्वाचे काम आहे.
2. मी रोज एसडीओ सोबत डायस वर बाजूला बसून केसेस सुनावणी चा अभ्यास करीत होतो. निर्णय झालेली वेगवेगळ्या कायद्याची जुनी प्रकरणे वाचत होतो. निर्णय कसा घेतला, आदेश कसा पारित केला , आदेशाचे ड्रॉफ्टिंग ,इत्यादी वरून बरेचशी माहिती मिळत होती. एसडीओ यांना शंका विचारात असे. सुनावणी झालेल्या काही प्रकरणात ड्रफ्ट-प्रारूप आदेश लिहायला मला केस देत होते. खूप चांगलं वाटायचे. सोबतच तक्रारी घेऊन आलेल्या लोकांचे एकूण घेऊन त्यांना दिलासा देण्याचे कामही एसडीओ करीत होते. एसडीओ ला लोक तसेच अधिकारी कर्मचारी , नेते ,कार्यकर्ते ,सगळेच मान सन्मान द्यायचे. एसडीओ ,बैठका घ्यायचे ते शिकणे ही महत्वाचे होते. तसेच, तपासणी, निरीक्षणे, कार्यालय भेटी , कामांचा आढावा ही एक जबाबदारी पार पाडताना पाहिले.
3. ट्रेनिंग सुरू असताना ,विभागीय आयुक्त नागपूर यांचा दौरा ठरला. दौऱ्याची तयारी एसडीओ ,तहसीलदार करीत होते. हा ही कामाचा एक भाग आहे असे मला सांगण्यात आले. आयुक्त यांचा दौरा व्यवस्थित व यशस्वी करणे ही एसडीओ ची जबाबदारी होती. यंत्रणा हाताशी असतेच. मी आयुक्त यांना भेटलो नव्हतो . त्यामुळे ,मी एसडीओ यांना विनंती केली की मला आयुक्त साहेबांना भेटायचे आहे. म्हणाले, भेटू नका, आयुक्त फार कडक आहेत, ते भेटणार नाहीत, पूर्व परवानगी घ्यावी लागते .त्याशिवाय भेटता येत नाही. मी म्हणालो, घ्या परवानगी, माझी भेट घालून द्या. ते अनुकूल दिसले नाही. विभागीय आयुक्त म्हणजे फार मोठे अधिकारी त्यामुळे, बोलावल्याशिवाय जायचे नाही, भेटायचे नाही, बोलायचे नाही, असा प्रघात असावा. एसडीओ यांना आग्रह करता आला नाही . मात्र रेस्ट हाऊस ला हजर राहणे आवश्यक होते. स्वागत चा प्रोटोकाल.
4. आयुक्त आले .त्यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी , तसेच सीईओ होते. कलेक्टर पूर्वीपासून रजेवर होते. म्हणून सोबत नव्हते.
एसडीओ यांनी स्वागत केले. मला दूर बाजूला उभे राहायला सांगितले होते. मी तेथे होतो. आयुक्त लगेचच पंचायत समिती ला मेमो रिडींग ला गेले. आम्ही रेस्ट हाऊस ला च थांबलो होतो. मेमो रिडींग नंतर आले व रेस्ट हाऊस च्या वरहंड्यात टांगलेले चित्र बघत होते. मी हिम्मत करून ,पुढे गेलो आणि आयुक्तांना भेटलो. माझी ओळख करून दिली, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून. आयुक्तांनी बसविले. विचारपूस केली. ट्रेनिंग बाबत, काही कायद्याचे प्रश्न ही विचारले. मी समाधानकारक उत्तर दिले. माझी चर्चा सुरू असताना ,एसडीओ मात्र अस्वस्थ होत होते. पूर्व परवानगी न घेता भेटलो तेव्हा काहीतरी विपरीत घडेल असे त्यांना वाटत होते. साहजिकच, त्यांचा अनुभव फार मोठा होता. आयुक्त यांचेशी 5-10 मिनिटे बोलणे झाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची विभागीय परीक्षा देऊन आलो होतो. ही परीक्षा 1982च्या तुकडीचे IAS अधिकारी आणि MPSC चे उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यासाठी संयुक्त परीक्षा होती. काही पेपर्स विथ बुक्स आणि काही विदाऊट बुक्स होते. त्यासाठी अभ्यास केला होता. त्याचा फायदा ,बोलतांना झाला. आयुक्त खूप छान बोलले, मार्गदर्शन केले. आयुक्तांशी भेटून आनंद वाटला. एसडीओ यांना जी भीती वाटत होते तसे काही झाले नाही. त्यांचेही टेन्शन कमी झाले. आयुक्त जेवले व निघून गेले.
5. आयुक्त शिवरामकृष्णन हे फार जेष्ठ , 1957 चे IAS ऑफिसर होते हे नंतर कळले. आयुक्त निघून गेल्यावर ,एसडीओ मला म्हणाले कशाला भेटलात.? नाही भेटायचे असते.प्रोटोकाल खूप पाळला जातो असे लक्षात आले. एसडीओ काळजीपोटी बोलत होते.
6. आठ दिवसांनी एक आश्चर्यजनक घटना घडली. प्रशासकीय कारणास्तव वर्धा येथून गडचिरोली ला बदली झाल्याचा आदेश आल्याचे मला सांगण्यात आले. उर्वरित ट्रेनिंग गडचिरोली जिल्ह्यात होणार होते. बदली ची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. एसडीओ म्हणाले ,म्हटलं होतं ना आयुक्तांना भेटू नका म्हणून. भोगा आता, जा गडचिरोली ला. येथील पोस्टिंग म्हणजे शिक्षा समजली जायची, आता ही समजली जाते. जेष्ठ उपजिल्हाधिकारी सल्ला देत होते की आयुक्तांना भेटा ,विनंती करा बदली रद्द करण्यासाठी. ट्रेनिंग काळात बदली का झाली ह्याचे काहीच कारण दिसत नव्हते. आयुक्तांना भेटलो म्हणून बदली हे एसडीओ चे कारण पटत नव्हते. काहीच कळत नव्हते. प्रशिक्षण काळात, प्रशासकीय बदली ते ही माझी कोणतीही विनंती नसताना, होणे म्हणजे ,महाराष्ट्रातील पहिले उदाहरण होते. म्हणून ,सगळेच आश्चर्य व्यक्त करीत होते.
7. अनेकांचा सल्ला होता की आयुक्तांना भेटून बदली रद्द करण्याची विनंती करावी. मी थोडा विचलित झालो होतो. प्रशिक्षण काळ म्हणजे शिकण्याचा काळ, प्रत्यक्ष काम करण्याचा नसतो कारण कोणतेही अधिकार वापरले जात नाहीत. प्रत्यक्ष प्रशासन करीत नाही, त्यामुळे प्रशासकीय बदली होण्याचे काहीच कारण नव्हते. पण झाली हे वास्तव होते. हा विषय मी घरी माझी पत्नी रेखा यांच्यासोबत पुन्हा चर्चिला आणि सल्ला विचारला. तिने सांगितले, आपण मुंबई ची ongc ची मोठया पगाराची नोकरी सोडून आलो आहोत. तेव्हा, वर्धा किंव्हा गडचिरोली काय फरक पडणार आहे. जाऊ गडचिरोलीला. सरकार जेथे पाठवेल तेथे जायचे, बदली साठी विनंती करायची नाही, कोणाला काही मागायचे नाही. Ongc सोडून हे पद स्वीकारले आहे तेव्हा स्वाभिमानाने काम करायचे. रेखाचा सल्ला मला मोठा धीर देऊन गेला. तिचे माहेर नागपूर आहे. वर्धेपासून 70 किलोमीटर आणि गडचिरोली 150 किलोमीटर. तरी तिने गडचिरोली ज्याण्याचा सल्ला दिला. आमचा निर्णय झाला. सहकारी अधिकाऱ्यांना सांगितले की बदली रद्द साठी विनंती करणार नाही, जाणार गडचिरोली ला. माझा निर्णय अनेकांना पटला नाही.
8. चंद्रपूर पासून गडचिरोली जिल्हा 26 ऑगस्ट1982 ला वेगळा झाला होता. जिल्ह्याचा कारभार चंद्रपूर येथूनच सुरू होता. मी जानेवारी 1984 ला रुजू झालो आणि जिल्हाधिकारी यांना भेटलो. जिल्हाधिकारी यांनी आस्थेने विचारपूस केली. रत्नाकर गायकवाड हे जिल्हाधिकारी होते. प्रशिक्षण सुरू झाले. जिल्हाधिकारी मला सोबत न्यायाचे दौऱ्यावर, समजावून सांगायचे. खूप तळमळीने ,झोकून देऊन काम करताना मी त्यांना पाहिले. त्यांचे पाठपुराव्यामुळेच जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत व कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी घरे लवकर तयार झाली होती. प्रशिक्षण काळात, लखीना पॅटर्न नुसार दप्तर ची रचना व्हावी हा माझा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी मान्य केला व राबविला.
9. प्रशिक्षणाचा भाग म्हणून गडचिरोली तहसीलदार म्हणून पोस्टिंग मिळाली, चार महिनेसाठी.कालावधी कमी असला तरी शिकायला खूप मिळाले. गावात जाऊन रात्री शाळेत मुक्काम केला. शिकलो. बेघरा साठी घरकुल बांधण्याची योजना महसूल विभागाकडे होती. जिल्हाधिकारी यांचे बैठकीत विषय चर्चेला आला. मी नवीनच होतो. जिल्हाधिकारी म्हणाले मजबूत, अतिशय चांगले घरकुल झाले पाहिजे. सर्व जबाबदारी तहसीलदार यांची. मात्र, घरकुल ला लागणारे कवेलू व इतर साहित्य खरेदी जिल्हाधिकारी कार्यालय करणार. मी सहजबोलून गेलो, कवेलू ,दरवाजे खिडक्या जर चांगल्या प्रतीच्या नसतील तर पुढे काही दोष आढळले तर जबाबदारी तहसीलदार यांच्यावर कशी टाकता येईल? घरकूल बांधण्याची संपूर्ण जबाबदारी तहसीलदार यांची तर त्यांना स्वतंत्र पणे काम करू द्यावे. जिल्हाधिकारी यांना माझा मुद्धा पटला. त्यांनी तसे निर्देश दिलेत मात्र, याशी संबंधित काही उपजिल्हाधिकारी नाराज झाले. नंतर चार महिनेसाठी एक तालुका sdo झालो. आधी बनगीनवार एसडीओ होते नंतर सुमित मलिक आले. एक तालुका एसडीओ म्हणून चामोर्शी चा पदभार दिला होता. हळदी माल या पूरग्रस्त गावाचे पुनर्वसन चार महिन्यात केले. रत्नाकर गायकवाड जिल्हाधिकारी आणि सीईओ उमेश सारंगी पट्टे वाटप कार्यक्रमाला त्या गावी आले होते. अनेक वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रलंबित विषयकमी कालावधीत निकाली काढला ह्याचे माझे मलाच कौतुक वाटले. अनेक गोष्टी शिकलो, जिल्हा फिरलो प्रशिक्षण काळातच.
10. प्रशिक्षण संपताच, माझी नियमित पोस्टिंग अहेरी एसडीओ म्हणून झाली. मार्च 1985 ला अहेरी येथे रुजू झालो. रत्नाकर गायकवाड, मुन्शीलाल गौतम, अरुण पाटणकर, AM खान या जिल्हाधिकारी सोबत काम केले. अहेरी चा माझा कार्यकाळ साडे चार वर्षाचा. चार पोलीस अधीक्षक, अनेक IFS- फॉरेस्ट ऑफिसर्स प्रत्येकाकडून शिकलो. विशेष म्हणजे, अहेरी उपविभागातील आदिवासी माडिया, बडा माडिया यांचे जीवनापासून माणुसकीचे व सामाजिक न्यायाचे प्रशासन शिकलो. नक्षलवाद्यांच्या कारवाया सुरू असताना ,आदिवासी साठी निश्चितच अनेक चांगल्या गोष्टी करता आल्यात ह्याचा आनंद व समाधान आहे." आणखी एक पाऊल" व "प्रशासनातले समाजशास्त्र" या दोन पुस्तकात मी माझे काही प्रशासकीय अनुभव लिहले आहेत. पुन्हा मी या जिल्ह्यात ZP चा सीईओ म्हणून गेलो. पत्नी रेखाचा सल्ला कायमचा लक्षात ठेवला. पोस्टिंग,पद मागायचे नाही, दिले तेथे जायचे आणि स्वाभिमानाने व हिंमतीने काम करायचे. हेच शेवटपर्यंत केले. त्रास सहन केला, समाजाच्या हितासाठी चांगले करण्याचा शुद्ध हेतू ठेवून काम केल्यामुळे प्रसंगी चौकशी व कार्यवाहीला सामोरे जावे लागले. अवहेलना झाली तरी लाचारी पत्करली नाही, कोणापुढे हात पसरले नाही.
11. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश लक्षात ठेवून सचोटीने काम केले, दायित्व पार पाडले . नीतिमत्तेच्या जोरावर संविधान ओळख हा संविधान जागर चा उपक्रम 2005 मध्ये नागपूर येथून स्वतःच्या अधिकारात हिमतीने सुरू केला. आता, हा उपक्रम देशभर 2015 पासून सुरू झाला. माझ्या वडीलास वाटायचे मी कलेक्टर व्हावं आणि प्रामाणिकपणे, समाजाची सेवा करावी. कलेक्टर होण्याचे स्वप्न तर पूर्ण केलेपरंतु उपदेश नेहमीच ध्यानात ठेवून,नीतिमत्ता जोपासून गरीब गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न सातत्याने केला.
12. माझी पत्नी रेखा व नंतर च्या काळात मुली नेहा, क्रांती व नमा यांची खूप साथ मिळाली. महत्वाच्या पदांवर असताना , अनेक आमिष असताना मी बिघडलो नाही. व्यसन केले नाही, कोणाचेही कोणत्याही प्रकारचे शोषण केले नाही, उलट शक्य तेवढी मदतच करीत राहिलो. आई वडिलांचे संस्कार, बाबासाहेबांचा संदेश आणि पत्नी रेखाची साथ ह्यामुळे हे घडू शकले. चांगलं घडावं, सामाजिक न्याय व्हावा, ज्यांना मिळाले नाही त्यांना मिळावे ह्यासाठी झटत राहिलो. कुठे यश तर कुठे अपयश आले. प्रयत्न तर करत राहिले पाहिजे. नंतर चा प्रवास ,काही अनुभव ,*आणखी एक पाऊल* , व *प्रशासनातले समाजशास्त्र* या पुस्तकात लिहले आहे. एकूणच खूप चांगले आयुष्य लाभले. कसलीही पार्श्वभूमी नसताना, आई वडील निरक्षर असताना, घरी दारिद्र्य व अभावग्रस्त जीवन असताना , कलेक्टर होता आले आणि कामांमुळे आणि वर्तनामुळे समाजात थोडी का होईना चांगली ओळख लाभली. ह्याचे समाधान आहेच. म्हणून ,माझे रोल मॉडेल माझे वडील असे मी सांगतो. काहीं मूठभर बुद्धीजीवी अधिकारी यांना माझे विविध ठिकाणचे यश आणि विशेषतःशाळांमधून रोज संविधान प्रास्ताविका वाचन आणि 26 नोव्हेंबर ला संविधान दिवस हे उपक्रम आवडले नसावेत. बदनामी करणारे काही असतातच, अशांना दुसऱ्याचे चांगुलपण चांगले वाटत नाही. मूठभर आहेत असे लोक. आम्हाला वाईट अनुभव अशांचा आला आहे. सुशिक्षित ,बुद्धीजीवी म्हणवणाऱ्या अधिकारी ,विचारवंत व्यक्तींमध्ये एवढी असूया ,द्वेष, राग, ढोंगीपणा, घमंड, असे असामाजिक/अनैतिक वर्तन येते कुठून? मैत्री ,सहिष्णुता, व्यक्तीची प्रतिष्ठा या मूल्यांचे काही नाही का? अशा प्रकारच्या संकोचित व भ्रष्ट आचरणामुळेच प्रशासकीय व सामाजिक व्यवस्था बिघडत चालली आहे. आम्ही मात्र बुद्धाच्या विचाराचे मध्यम मार्गाचे प्रशासन केले. हे शिकणे,समजणे हा ही प्रशिक्षणाचाच भाग आहे .असो, प्रशिक्षण फार महत्वाचे असते. अशा प्रशिक्षणामुळे माणुसकीचे प्रशासन स्वाभिमानाने करता आले ह्याचे समाधान नक्कीच आहे.
इ झेड खोब्रागडे(भाप्रसे नि)संविधान फौंडेशन,नागपूर


0 Comments