एक छोटासा प्रयत्न.. ‘अँटिनावालं कासव’ हा लघुपट शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा पर्यावरण पत्रकार आरती कुलकर्णी यांच्या लेखणीतून...
'अँटिनावालं कासव'
आरती कुलकर्णी या पर्यावरण पत्रकार आणि डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आहेत. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह ऑलिव्ह रिडले कासवांचं संवर्धन व सागरी संवर्धनावर एक लघुपट बनविला आहे. हा लघुपट शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न..! आपणही https://youtu.be/b3hwUeKJdQM या लिंकद्वारे हा लघुपट पाहू शकता..
कोकणच्या किनाऱ्यांवरची ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाची चळवळ आता चांगलीच विस्तारली आहे. या पाच कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर बसविण्याचा अनोखा प्रयोग नुकताच रत्नागिरी जिल्ह्यात यशस्वीपणे पार पडला. या निमित्ताने मुंबई आणि कोकणच्या सागरी संवर्धनाची यशोगाथा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे.
काय आहे हा लघुपट आणि प्रकल्प?
मॅनग्रोव्ह फाउंडेशन आणि वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी हाती घेतलेल्या या प्रकल्पावर हा माहितीपट बनविण्यात आला आहे.
जंगलांच्या रक्षणासाठी जसा वाघ महत्त्वाचा तसंच समुद्री पर्यावरणासाठी सागरी कासवं महत्त्वाची आहेत. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 5 ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत. ही ऑलिव्ह रिडले कासवं नेमकी कुठून येतात, कुठपर्यंत प्रवास करतात, त्यांच्या सवयी काय आहेत अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा वन्यजीव संशोधकांचा प्रयत्न आहे.
पूर्व किनाऱ्यावर ओडिशामध्ये ऑलिव्ह रिडले कासवं मोठ्या संख्येने येतात. डॉ.आर. सुरेशकुमार यांनी याआधी ओडिशामधल्या 60 कासवांना अशा प्रकारे सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवून त्यांचा अभ्यास केला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर डॉ.आर. सुरेशकुमार आता पश्चिम किनारपट्टीवर येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचा अभ्यास करीत आहेत.
या कासवांचं मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून मरणं, पावसाळ्याच्या वेळी किनाऱ्यावर वाहात येणं, समुद्रातल्या प्लॅस्टिक प्रदूषणामुळे त्यांच्यावर आलेलं संकट या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर या कासवांचा अभ्यास होणं गरजेचं आहे.
ऑलिव्ह रिडले कासवं जानेवारीपासून एप्रिलपर्यंत कोकणच्या किनाऱ्यांवर प्रजननासाठी येतात. या महिन्यांत ती किनारपट्टीजवळच असतात पण उरलेल्या काळात ही कासवं नेमकी कुठे जातात? याबद्दलची महत्त्वाची माहिती आणि पुरावे यातून हाती लागणार आहे.
'प्रथमा’ने सांगितलेल्या गोष्टी:-
डॉ.आर. सुरेशकुमार यांनी सॅटेलाईट ट्रान्समीटर लावलेली ही पाच कासवं. त्यांच्या समुद्रातल्या प्रवासाचे सिग्नल देत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेळासला टॅग केलेल्या “प्रथमा” या कासविणीने समुद्रात 2 हजार 700 किलोमीटरचा प्रवास केला. दुर्दैवाने तिचा संपर्क तुटला पण या कासविणीने तिच्या उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या प्रवासाची महत्त्वाची माहिती सिग्नलद्वारे दिली आहे. ती सिंधुदूर्गातल्या कुणकेश्वरजवळ असताना तिचा शेवटचा सिग्नल आला. त्यानंतर ट्रान्समीटरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला असावा, असा वैज्ञानिकांचा कयास आहे.
“सावनी”ची ओळख:-
अंजर्ल्याला टॅग केलेली “सावनी” सॅटेलाईट ट्रान्समीटरसह पुन्हा एकदा अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर आली. एकाच हंगामात ही कासवं दोनदा किनाऱ्यावर येतात याचाच हा पुरावा आहे.
“रेवा” आणि “वनश्री”:-
त्याचबरोबर गुहागरला टॅग केलेली “रेवा” आणि “वनश्री” आणि अंजर्ल्याला टॅग केलेली “सावनी” समुद्रातून त्यांच्या प्रवासाचे सिग्नल देत आहेत. त्यामुळे सध्या तरी या तीन कासवांची माहिती हाती लागली आहे.
“लक्ष्मी” चं काय झालं?
गुहागरला टॅग केलेल्या “लक्ष्मी” या कासविणीचा संपर्क तुटला आहे पण तिच्याबद्दलची महत्त्वाची माहिती मिळाली आहे. “लक्ष्मी” कासवीण ही “अँटिनावालं कासव” या माहितीपटातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे.
या लघुपटात कोकणात झालेला हा अनोखा प्रयोग आणि महाराष्ट्राच्या सागरी संवर्धनाची 20 वर्षांची यशोगाथा मांडली आहे.
ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाची चळवळ मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वी झाली आहे. वेळास, गुहागर, वायंगणी हे किनारे तर कासवांची पंढरी म्हणून ओळखले जातात. कासवांच्या प्रजननाच्या काळात इथून हजारो पिल्लांना समुद्रात सोडलं जातं.
सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेने कासव संवर्धनाची चळवळ सुरू केली तेव्हा त्यांच्या कामावर 2006 मध्ये “गाज... call of the ocean” या लघुपटाची निर्मिती करण्यात आली होती. आता ‘अँटिनावालं कासव’ हा त्याच्या पुढचा टप्पा आहे.
“गाज... call of the ocean” या लघुपटात पहिल्यांदाच कोकणातल्या समुद्राखालचं विश्व सगळ्यांना दाखविण्यात आले. हा लघुपट मालवणच्या शाळेतल्या मुलांसोबत केला होता. आता ही मुलंही मोठी झाली आहेत आणि त्यांनी समुद्रात सोडलेली कासवांची पिल्लंसुद्धा.
कासव संवर्धन, किनाऱ्यांची स्वच्छता, प्लॅस्टिक प्रदूषणावरचे उपाय, कासवांचं सागरी जीवनातलं महत्त्वाचं स्थान, यामध्ये मच्छिमारांचं आणि कोकणातल्या गावकऱ्यांचं योगदान याबद्दलच्या रंजक गोष्टी ‘अँटिनावालं कासव’ या लघुपटात मांडण्यात आल्या आहेत.
मुंबईसारख्या महानगरामध्ये किनाऱ्यांची स्वच्छता झाल्यानंतर काय घडलं? हेही यात दाखविले आहे. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल रोखायचा असेल तर समुद्री पर्यावरणाचं संवर्धन हा मोलाचा उपाय आहे.
या लघुपटात समस्यांवर उपाय शोधणारी माणसं, वनविभाग, कांदळवन कक्ष, समुद्रासाठी झटणारे कार्यकर्ते, संशोधक आणि त्यांच्या पाठिशी उभे राहणारे राज्य शासन या सगळ्यांचे प्रयत्न मांडले आहेत.
“हिरवळ” प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया यांचा “शेकरू वन्यजीव संवर्धन” संस्थेच्या उपक्रमांना नेहमीच पाठिंबा असतो. “गाज… Call of the Ocean, जन्नत ए नाईल, नातं पश्चिम घाटाशी” या लघुपटांसाठी हिरवळ प्रतिष्ठानचं महत्त्वाचे सहकार्य लाभले आहे. “अँटिनावालं कासव” या लघुपटालाही त्यांची मोलाची मदत झाली आहे.
तर मग करा क्लिक अन् भेटा “अँटिनावाल्या कासवाला..!”
https://youtu.be/b3hwUeKJdQM
पर्यावरण पत्रकार- श्रीमती आरती कुलकर्णी{शेकरू वन्यजीव संवर्धन संस्था}






0 Comments