सिंचन विहिरीसाठी आता चार लाखांचे अनुदान रोजगार हमी योजना: अनेक कुटुंब होणार समृद्ध
बेलकुंड:(प्रतिनिधी/महेश कोळी) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून आता शेतकऱ्यांना ३ लाखांऐवजी ४ लाखांचे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती रोजगार हमी विभागाकडून प्राप्त झाली आहे. प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या रोहयो विभागाने ४ नोव्हेंबर रोजी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया जाहीर केली असून, त्यानुसार मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे.
रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे करताना लाभार्थी शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो, विहिरीचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यास मान्यता देण्यास विलंब होणे, अनुदान अपुरे असल्याने विहिरीची काम करण्यास अडचणी, शिवाय मजुरी आणि कुशल निधी वेळेत न मिळणे, बिल काढण्यास विलंब होणे अशा विविध कारणांमुळे शेतकरी हैराण होतात. याबाबत रोजगार हमी विभागाकडे तक्रार दाखल केल्या जात होत्या. याबाबीचा विचार करून रोहयो विभागाने नव्याने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, महिला प्रमुख असलेली कुटुंबे, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी दिव्यांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे, अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी खालील लाभार्थी, सीमांत शेतकरी, अल्प भूधारक शेतकरी अशा विविध घटकांतील लाभार्थी पात्र असणार आहेत. ग्रामसभेच्या मान्यतेनंतर एका महिन्याच्या आत गटविकास अधिकारी कार्यालयाने विहिरींच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणे आवश्यक आहे.

0 Comments