Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्हा रुग्णालय हस्तांतरण प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी प्राधान्याने दूर करणार.. पालकमंत्री गिरीष महाजन यांचे माझं लातूर परिवारास आश्वासन

लातूर जिल्हा रुग्णालय हस्तांतरण प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी प्राधान्याने दूर करणार.. पालकमंत्री गिरीष महाजन यांचे माझं लातूर परिवारास आश्वासन


लातूर : लातूर जिल्हा रुग्णालय हस्तांतरण प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी येत्या ३ दिवसात प्राधान्याने पूर्ण करून जिल्हा रूग्णालय प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन लातूरचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी माझं लातूर परिवाराच्या शिष्टमंडळास दिली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी त्वरित प्रस्ताव सादर करावा अशी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.


लातूर जिल्हा रूग्णालय उभारणीसाठी महाराष्ट्र शासनाने जागा हस्तांतरण करण्यास मंजुरी दिलेली आहे. यासाठी मोबदला म्हणून आरोग्य विभागाने ३ कोटी ३२ लाख ६८ हजर ६५० रुपये कृषी विभागास देण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र अद्याप हा निधी वर्ग न झाल्याने जागा हस्तांतरण रखडले आहे. हा निधी त्वरीत वर्ग करून नियोजित जिल्हा रूग्णालय बांधकाम सुरू करावे अशी मागणी माझं लातूर परिवाराच्या वतीने पालकमंत्री गिरीष महाजन यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. गत १४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा रूग्णालय मंजुरीसाठी माझं लातूर परिवाराने निर्णायक लढा दिला आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये साखळी उपोषण, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि मंत्री महोदयांना प्रत्यक्ष भेटून यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती केली होती तर मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पालक मंत्री, आरोग्य विभागाचे सचिव, कृषी विभागाचे अधिकारी यांना साकडे देखील घातले होते.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी पालकमंत्री लातूरला आले होते. काल झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत देखील या प्रश्नावर चर्चा झाली असून सर्व आमदारांनी देखील हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली असल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले. या भेटीदरम्यान लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे, पोलिस अधिक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, तहसीलदार सौदागर तांदळे यांचीही उपस्थिती होती.

माझं लातूर परिवाराच्या वतीने डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर, सतीश तांदळे, अभय मिरजकर, डॉ सितम सोनवणे, काशिनाथ बळवंते, ॲड. प्रदिप मोरे, उमेश कांबळे, गोपाळ झंवर यांनी पालकमंत्र्यांना निवेदन सादर केले.

Post a Comment

0 Comments