Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हा रुग्णालयासाठी माझं लातूर परिवाराचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना साकडे निवेदन सादर

जिल्हा रुग्णालयासाठी माझं लातूर परिवाराचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना साकडे निवेदन सादर


लातूर : जिल्हा रूग्णालय हस्तांतरण निधी वर्ग करून त्वरित भूमिपूजन करावे असे साकडे घालून माझं लातूर परिवारातील पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबतचे दुसऱ्यांदा निवेदन दिले. परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवात उपस्थित राहण्यासाठी ते लातूर विमानतळावर उतरले होते.

लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी शासनाने जागा हस्तांतरण करण्यास मंजुरी दिलेली आहे. यासाठी लागणारा मोबदला रुपये ३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६५० रुपये कृषी विभागास देण्याची तरतूद देखील केली आहे. मात्र अद्याप यासाठीचा निधी आरोग्य विभागाने कृषी विभागास वर्ग केलेला नाही. हा निधी त्वरीत वर्ग करून लातूरच्या प्रलंबित आणि मंजूर असलेल्या जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन करून लातूरकरांना उपकृत करावे अशी विनंती यावेळी पत्रकारांनी केली. हा निधी वर्ग करून ६० दिवसांच्या आत जिल्हा रूग्णालय हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे असा शासन आदेश (१९ जून २०२४) आहे. याची मुदत  १९ ऑगस्ट २०२४ रोजी संपली आहे.


गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न शासनाने मार्गी लावला यासाठी महाराष्ट्र शासनाचे आभार देखील मानण्यात आले. जिल्हा रूग्णालय व्हावे यासाठी माझं लातूर परिवाराने निर्णायक लढा दिला आहे. ऐतिहासिक साखळी उपोषण, मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पालक मंत्री यांना विनंती केली होती.

राज्याचे प्रमुख आणि संवेदनशील, जाणकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून आपण हा प्रश्न त्वरित मार्गी लागेल यासाठी त्वरीत निर्देश द्यावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. माझं लातूर परिवाराच्या शिष्टमंडळात सतीश तांदळे, अभय मिरजकर, नितीन बनसोडे, महेंद्र जोंधळे, हारुन मोमीन, रत्नाकर निलंगेकर, श्रीराम जाधव, सचिन अंकुलगे, डॉ सितम सोनवणे, उमेश कांबळे, सुनिल कांबळे, वैभव बालकुंदे, ऋषी होळीकर, अमोल घायाळ, विजय कवाळे, निशांत भद्रेश्वर, असिफ पटेल या पत्रकार बांधवांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments