किरण कुलकर्णींचे राज्यस्तरीय लोगो डिझाइन स्पर्धेत उल्लेखनीय यश
लातूर : वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योग विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय लोगो डिझाइन स्पर्धेत लातूर येथील के. के. ग्राफिक्सचे संचालक किरण कुलकर्णी यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. निलंगा तालुक्यातील हलगरा- औरास शहाजनी येथील मूळ रहिवासी असलेले सध्या लातूर येथे वास्तव्य करणारे कुलकर्णी यांच्या या यशाने ग्राफिक डिझाइन क्षेत्रातील त्यांच्या कला व कुशलतेचा प्रत्यय सर्वत्र आला असून, लातूर जिल्ह्याच्या कलावंतांना प्रेरणादायी ठरले आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून वंदे मातरम् गीताच्या वैभवाला प्रतिबिंबित करणारे लोगो डिझाइन तयार करण्याचे आव्हान कलावंतांना देण्यात आले होते. किरण कुलकर्णी यांच्या डिझाइनने स्पर्धकांमधून बाजी मारली असून, त्यांना रोख रक्कम व मानपत्राने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान मुंबई येऊन आयोजित भव्य समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रदान होईल.
लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
निलंगा तालुक्यातील हलगरा औरास शहाजनी गावचे मूळ रहिवासी असलेले किरण कुलकर्णी सध्या लातूर येथे वास्तव्य करत के. के. ग्राफिक्सच्या माध्यमातून ग्राफिक डिझाइन क्षेत्रात सक्रिय आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक व राष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकल्प हाती घेत त्यांनी आपली छाप पाडली आहे. त्यांच्या या यशामुळे लातूर जिल्ह्यातील कलाक्षेत्राला नवे बळ मिळाले आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे व वंदे मातरम् सार्धशती राज्य समितीचे सदस्य डॉ. संदीपान जगदाळे, ज्येष्ठ पत्रकार संजय स्वामी, के वाय पटवेकर विधीतज्ञ योगेश हलगरकर, उल्हास डोलारे, पदमसिंह पाटील, दिगंबर अंतरेड्डी यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे. किरण कुलकर्णी यांच्या या यशाने स्थानिक तरुणांना डिझाइन क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.



0 Comments