Latest News

6/recent/ticker-posts

शासकीय योजनांचा लाभ हवाय तर करा दिव्‍यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी

शासकीय योजनांचा लाभ हवाय तर करा दिव्‍यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी

जिल्‍ह्यातील दिव्‍यांग बांधवांना घेता येणार केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ

लातूर : महाराष्‍ट्र राज्‍य दिव्‍यांग कल्‍याण विभागामार्फत दिव्‍यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्‍यात येतात. यात दिव्‍यांगांची हेळसांड होऊ नये व घरबसल्‍या योजनेचा लाभ घेणे सोईचे होईल या दृष्‍टी कोणातून तुकारामजी मुंढे सचिव, दिव्‍यांग कल्‍याण विभाग मंत्रालय, मुंबई यांच्‍या संकल्‍पनेतून राज्‍य शासनाच्‍या वतीने दिव्‍यांग सहाय्यक पोर्टल निर्मिती करण्‍यात आली आहे. या पोर्टलवर जिल्‍ह्यातील दिव्‍यांग बाधवांनी ऑनलाईन नोंदणी करुन शासकीय योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

केंद्र व राज्‍य शासनाच्‍या मार्फत दिव्‍यांगांना सक्षम बनविण्‍यासाठी विविध कल्‍याणकारी योजना राबविण्‍यात येतात. या योजनेचा लाभ दिव्‍यांगांना सुलभ होण्‍याच्‍या दृष्‍टीने या पोर्टलची निर्मिती करण्‍यात आली आहे. दिव्‍यांगाच्‍या विविध योजना यात असून विविध विभागातील माहिती यात दर्शविण्‍यात आली आहे. एकाच छताखाली दिव्‍यांग बांधवांच्‍या विविध योजना यात सामिल करण्‍यात आल्‍या आहेत. यात शासकीय योजनासह सेवा व लाभ ही यातून मिळणार आहे. दिव्‍यांग विद्यार्थी शिष्‍यवृत्‍ती, साधने व उपकरणे, स्‍वयंरोजगारासाठी साधन सामुग्री, अर्थसहाय्य, गुणवत्‍ता पुरस्‍कार, सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्‍साहन अनुदान, विविध शाळा व महाविद्यालयातील प्रवेश, रुग्‍णालयातील उपचार यासह अनेक योजनांचा या पोर्टलवर समावेश करण्‍यात आला. दिव्‍यांगांनी https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in/ या संकेतस्‍थळावर ऑनलाईन नोंदणी करतांना UDID क्रमांक टाकून नोंदणी करावी व विवि‍ध योजनांचा लाभ घेण्‍याचे आवाहन जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, राहूलकुमार मीना (भा.प्र.से), संतोषकुमार नाईकवाडी (जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर) यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments