Latest News

6/recent/ticker-posts

युनिव्हर्सल पब्लिक स्कूलमध्ये रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; 'जर्नी ऑफ इंडिया'ने जिंकली उपस्थितांची मने

युनिव्हर्सल पब्लिक स्कूलमध्ये रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; 'जर्नी ऑफ इंडिया'ने जिंकली उपस्थितांची मने

औरद शहाजनी : येथील युनिव्हर्सल पब्लिक स्कूलमध्ये शाळेच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरे करण्यात आले. भारताचा गौरवशाली इतिहास आणि प्रगतीचा वेध घेणाऱ्या “Journey of India” या मुख्य संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुंबईचे इन्कम टॅक्स कमिशनर (IRS) डॉ. राघवेंद्र चांबोळकर यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा परिषद समिती सदस्या डॉ. योगिता जाधव, औरद शहाजनीचे केंद्रप्रमुख सिद्धराम चिल्लाळे आणि केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बालाजी थेटे उपस्थित होते. तसेच मंचावर सीमायकात्मता संस्थेचे अध्यक्ष राजकन्याजी दरक, सचिव जयश्री कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, सुंदरलाल दरक, मुख्याध्यापिका श्रुती कुलकर्णी व पंकज कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी पंकज कुलकर्णी यांनी शाळेच्या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला, तर मुख्याध्यापिका श्रुती कुलकर्णी यांनी वार्षिक अहवाल सादर केला.

या स्नेहसंमेलनात शाळेच्या तब्बल ९७८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 'जर्नी ऑफ इंडिया' या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी आर्यभट्टांचा काळ, चोळ व चालुक्य राजांचे वैभव नृत्याद्वारे सादर केले. भारताच्या चार युगांचे दर्शन घडवत असतानाच, ब्रिटिशांविरुद्धचा स्वातंत्र्यलढा अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, अशफाक-उल्ला-खान, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्या योगदानाचे सादरीकरण पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. तसेच पंडित नेहरू आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर भारताची प्रगती, हरितक्रांती, मंगळयान मोहीम आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्यगाथा विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून जिवंत केल्या. कार्यक्रमाची सांगता भारतरत्न लता मंगेशकर यांच्या "तू ईश्वर तू अल्ला" या गीताने शांततेचा संदेश देत करण्यात आली. हा भव्य सोहळा पाहण्यासाठी औरद शहाजनी व परिसरातील सुमारे ४ हजार नागरिक व पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments