ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी चळवळीतील प्रख्यात नेते शब्बीर अन्सारी यांचे दीर्घ आजाराने निधन
जालना : ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी चळवळीतील प्रख्यात नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे रविवारी (२२ मार्च) दुपारी १२.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
अन्सारी हे जुना जालना येथील रेल्वे गेटजवळील नूतन वसाहतीत वास्तव्य करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सहा मुली व मोठा परिवार आहे. आज रात्री ईशा नमाजानंतर रात्री ९ वाजता त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघणार असून, सय्यद अहमद शेरसवार दर्गा मैदानावर नमाज-ए-जनाजा अदा होईल. त्यानंतर जवळील कब्रस्तानमध्ये दफनविधी पार पडेल. ओबीसी चळवळीतील भक्कम व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या अन्सारी यांनी चार दशकांहून अधिक काळ ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी समर्पित जीवन जगले. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महाराष्ट्रासह देशभर सामाजिक न्याय व आरक्षणाच्या मुद्द्यांवर जनजागृती केली.
त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शिक्षण, रोजगार व राजकीय प्रतिनिधित्वासंबंधीच्या ओबीसी समस्या सोडवण्यासाठी ५० हून अधिक शासकीय निर्णय (जीआर) जारी झाले. तळागाळातील लोकांशी सोप्या भाषेत संवाद साधण्याची त्यांची शैली यामुळे त्यांना सन्मान मिळाला. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यासह मंडल आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणी व मुस्लिम ओबीसी समावेशासाठी त्यांनी देशभर नेत्यांसोबत काम केले. प्रशासकीय अडचणी व राजकीय विरोध असूनही ठाम राहिलेल्या अन्सारी यांचे छत्रपती संभाजीनगर येथील मंडल दिन मेळाव्यातील भाषण तरुणांना प्रेरणा देणारे ठरले. राज्यातील नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत चळवळीत पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले.



0 Comments