Latest News

6/recent/ticker-posts

व्यावसायिक शिक्षणातून दिव्यांगांना रोजगाराच्या संधी- संतोषकुमार नाईकवाडी

व्यावसायिक शिक्षणातून दिव्यांगांना रोजगाराच्या संधी- संतोषकुमार नाईकवाडी

जीवन विकास प्रतिष्ठान मध्ये पालक मेळावा

लातूर : शालेय शिक्षणानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जेणेकरून दिव्यांग विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहतील असे प्रतिपादन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी बुधवारी केले. 

जीवन विकास प्रतिष्ठान संचलित ॲड. विजयगोपाल अग्रवाल मुकबधिर विद्यालय, सौ. सुशिलादेवी देशमुख मुलींचे निवासी मुकबधिर विद्यालय व मतिमंद विद्यालय या तिन्ही शाळेच्या पालक मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. मंचावर जीवन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसिंहराव देशमुख, सचिव धनंजय देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकला भार्गव, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर अग्रवाल, संजय निलेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी, जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना संतोषकुमार नाईकवाडी म्हणाले, उन्हाळी सुट्टयांत विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम देवून त्यांना गुंतवून ठेवावे. जेणेकरून ते मोबाईलच्या जास्त संपर्कात येणार नाहीत. या तिन्ही शाळेचे काम उत्तम असून दिव्यांगांना पालकांनीही मुख्य प्रवाहात आणावे. विविध लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमातही त्यांचा सहभाग राहावा यासाठी प्रयत्नशील रहावे. प्रास्ताविकात पी.व्ही. कुलकर्णी यांनी संस्थेचा लेखाजोखा मांडत पालक व शाळांतील समन्वयक आवश्यक असल्याचे सांगितले. संस्था सचिव धनंजय देशमुख यांनी व्यावसायिक शिक्षणासाठी शासनाकडे पाठपुरावा करून दिव्यांग विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करू असे सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थी व पालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशांत कुलकर्णी यांनी केले तर आभार मुख्याध्यापक शिवप्रसाद भंडारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक जयश्री कुलकर्णी, जयलाल गायकवाड यांच्यासह संस्थेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

240 पालकांचा सहभाग

या पालक मेळाव्यात तिन्ही शाळेतील 240 पालकांनी सहभाग नोंदविला असून विविध अभ्यासक्रम व अन्य विषयांची माहिती शाळेतील विशेष शिक्षक सिंधु इंगळे, डी.डी. कांबळे, बंकट पवार यांनी दिली. यावेळी पुणे येथील एका खाजगी कंपनीत नौकरीच्या संधी उपलब्ध असल्याचेही कार्यकारिणी सदस्य पी.व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments