२८४ केंद्रांवर CET सुरू; तंत्रज्ञानाने सुरळीत आयोजन
लातूर : CET आयुक्त दिलीप बी. सरदेसाई (भा.प्र.से. आयुक्त आणि सक्षम प्राधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली CET कक्षाने परीक्षेतील पारदर्शकता, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक तंत्रज्ञान आधारित उपाययोजना राबवल्या आहेत. यामुळे परीक्षा निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्याची कटिबद्धता पुन्हा अधोरेखित झाली आहे. या उपाययोजनांमध्ये परीक्षेच्या प्रत्यक्ष हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मध्यवर्ती डिजिटल देखरेख पोर्टलचा समावेश आहे. तसेच, सर्व केंद्रांवर CCTV पाळत, पर्यवेक्षकांसाठी बॉडी कॅमेरे आणि बायोमेट्रिक पडताळणी यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. यामुळे प्रक्रियेची कडक देखरेख आणि सचोटी अबाधित राहणार आहे.
उमेदवारांचा अनुभव सुखद करण्यासाठी केंद्र वाटप प्रक्रियेत सुधारणा करण्यात आल्या. यामुळे लातूर येथील पुरणमल लाहोटी शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था हे केंद्र अनेक उमेदवारांना त्यांच्या पसंतीचे मिळाले. केंद्रांवर प्रमाणित उच्च दर्जाची पायाभूत सुविधा उभारल्याने उमेदवारांना आरामदायी, निर्विघ्न वातावरण उपलब्ध झाले आहे.
उमेदवारांकडून सुरुवातीचा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक आहे. सुधारित यंत्रणा, पायाभूत सुविधा आणि एकूण अनुभवाबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. CET कक्ष संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवत सर्वोच्च निकष राखण्याची खात्री देत आहे. विशेषतः मुलींचा वाढता सहभाग हे महाराष्ट्रात शिक्षणाच्या समान, सर्वसमावेशक संधी उपलब्ध होत असल्याचे द्योतक आहे.



0 Comments